जळगाव प्रतिनिधी ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील पांडुरंग नगर येथे एका बंद असलेल्या घरातून अज्ञात चोरटयांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , पिंप्राळा परिसरातील पांडुरंग नगर येथे प्लॉट नं 4 गट न 347/ब येथे प्रदीप सोनवणे हे पत्नी वैशाली सोनवणे व मुलगा यश या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. 11 जानेवारी रोजी प्रदीप सोनवणे हे पत्नी वैशालीसह मूळ गावी जळगाव तालुक्यातील देवगाव येथे शेतीकामासाठी गेल्याने मुक्कामी थांबले. बुधवारी सकाळी 11 वाजता प्रदीप सोनवणे यांना त्यांचे जळगाव शहरातील घराशेजारील पूजा पवार यांचा फोन आला. पवार यांनी घराचा कडी कोयंडा तुटलेला व घरात चोरी झाली असल्याचे सोनवणे यांना सांगितले. त्यानुसार प्रदीप सोनवणे हे पत्नीसह जळगावात घरी परतले. त्यावेळी सोनवणे या दाम्पत्यास घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. तसेच घरातील कपाटात ठेवलेली रोकड, दागिणे व लॅपटॉप हे दिसून आले नाही. चोरट्यांनी घरातून 10 ग्रॅमचे 30 हजारांचे सोन्याचे मेडल, 7 ग्रॅमचे 20 हजारांचे सोन्याचे कानातले, 15 ग्रॅमची 45 हजारांची सोन्याची चैन, 5 ग्रॅमच्या 30 हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, दीड ग्रॅमचे 1 हजार 500 रुपयांचे सोन्याचे मणी, 13 ग्रॅम 34 हजारांचे सोन्याच्या अंगठ्या, पेंडल, कानातील बाळी या दागिण्यांसह 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, व 16 हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख 99 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. सोनवणे यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसांना माहिती कळविली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा तसेच कर्मचारी विजय खैरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. याबाबत रात्री सात साडेसात वाजेच्या सुमारास वैशाली प्रदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सतीष डोलारे हे करीत आहेत.







