जळगाव- सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली आहे.
जागतीक आरोग्य संघटनेने करोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. तसेच करोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात गतीने पसरत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याने त्याकरीता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जळगांव जिल्हयात करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून “नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी वेळोवेळी आदेश निर्गमित करुन देखील नागरीक रस्त्याने ये-जा करीत आहेत. नागरीकांनी कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये असे वारंवार आदेशित करुनही नागरीक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करत आहेत, वाहनाने ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.” करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव हे संकट पाहता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, नागरीकांची गर्दी होऊ नये. या पार्श्वभुमीवर जळगांव जिल्हयामध्ये जळगांव शहर महानगरपालिका जळगांव, सर्व नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रामधील व ग्रामिण क्षेत्रामधील दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, अनावश्यकरीत्या फिरणारी इतर वाहने यावर निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. अविनाश ढाकणे यांनी निगर्मित केले आहे.