मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची कामगिरी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुऱ्हा ते चिंचखेडा गावाच्या फाट्याजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कारमध्ये आलेल्या चौघांना मुक्ताईनगर पोलीसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे. चौघांकडून ४ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर ते कुऱ्हा रोडवर चिंचखेडा गावाच्या फाट्याजवळ दरोडा टाकणारे चार जण कारमध्ये आले असल्याची गोपनिय माहिती मुक्ताईनगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार सोमवार ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकून दरोडा टाकणारे कन्वरलाल रामप्रसाद पवार (वय-३५), देव डॅनी पवार (वय-२२), राहूल कपीलाल भोसले (वय-२३), करण कपुर डॅनी पवार (वय-२४) सर्व रा. मधापुरी ता. मुक्ताईनगर या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून चार मोबाईल, ५ हजारांची रोकड आणि मारूती कार असा एकुण ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रदीप इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहे.