कुटुंबीय आणि सोबतच्या मित्राने बुटांच्या फोटोंनी ओळख पटवली

जळगाव ( प्रतिनिधी ) – दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ १ डिसेंबररोजी अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटली असून अभिजित गजानन मेश्राम (वय-१९ , रा.लाझोडा हनुमान मंदीरजवळ, गडचिरोली ) असे मयत तरूणाचे नाव आहे.
तो मित्रासह पुण्याला जाण्यासाठी गरीब रथ रेल्वेने प्रवास करत होता. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अभिजित मेश्राम व त्याचा मित्र परिमल गोपीनाथ कोडापे नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी गरीब रथ रेल्वेत बसले. जळगावपर्यंत आल्यानंतर रात्री दोघांनी रेल्वेत जेवण केले. नंतर परिमल झोपून गेला. अभिजित मिश्रा जागा होता, तो रेल्वेतच शतपावली करतो असे म्हणाला होता. दरम्यान सकाळी ६ वाजेच्या सुमारास परिमलला जाग आली, तेव्हा अभिजित त्याला जागेवर दिसला नाही.
शोध घेऊनही तो सापडत नसल्याने आणि दरम्यानच्या वेळेत अभिजीतच्या वडिलांचे कॉल येत असल्याने परिमलने अभिजितच्या वडीलांना घटनेची माहिती दिली. अभंजितचे वडील लष्करातील जवान आहेत. त्यांनी रेल्वे रूटवरच्या सर्व रेल्वे पोलीसांना माहिती दिली. नगर रेल्वे पोलीसांना मुलाबाबत माहिती दिल्यानंतर तेथील पोलीसांनी जळगाव तालुका पोलीसांशी संपर्क साधला. अनोळखी तरूणाचा मृतदेह १ डिसेंबर रोजी सकाळी दापोरा – शिरसोली दरम्यान रेल्वे रूळावर आढळल्याचे त्यांना मनमाडच्या पोलिसांकडून सांगण्यात आले. आज ३ डिसेंबर रोजी अभिजितचे नातेवाईक आणि परिमल जळगाव जिल्हा रूग्णालयात आले अभिजीतने ऑनलाईन बूट खरेदी केले होते . त्या बुटांचे फोटो अभिजीतच्या आईकडे होते . पोलिसांनी मृतदेहाच्या पायातील बुटांचे फोटो आई – वडिलांना दाखवले आणि मृतदेहाची ओळख पटली. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अभिजितच्या पश्चात आई, वडील व एक बहिण असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहेत.







