पाचोरा शहरातील घटनेने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी
पाचोरा (प्रतिनिधी) : येथील एका रुग्णालयात विवाहाच्या १६ वर्षांनंतर जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या मातेचा प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथील बाहेरपुरा भागात गुरुवारी घडली. या घटनेमुळे पाचोरा शहरात शोककळा पसरली आहे.
ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (वय ३७) असे मृत मातेचे नाव आहे. पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील माहेरवाशीण ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (वय ३७) हिला लग्नाच्या १६ वर्षांनंतर बुधवार दि. १९ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास भडगाव रस्त्यावरील सावनेरकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.(केसीएन)त्यांना मुलगी व मुलगा अशी दोन बाळं जन्माला आली. दोन्ही बाळं जन्माला आल्यानंतर ३ तासात बाळाला जन्म देणारी आई ज्योती चौधरी यांचे सायंकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.या घटनेने महिलेचा पती, आई, वडील, भाऊ यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. बाळ झाल्याचा आनंद पती-पत्नी व आई-वडिलांना झाला होता. मात्र, तीन तासांनंतर त्या आनंदावर विरजण पडले. त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. बाळाच्या आईला हृदयविकाराचा झटका आला. त्यात तिचा मृत्यू झाला. घटनेमुळे ज्योतीचा माहेर व सासरचा परिवार शोकाकुल झाला आहे.