अमळनेर येथील बोरसे गल्लीतील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- हज यात्रेला गेलेल्या दोन्ही भावांची भरवस्तीतील घरे फोडून अज्ञात चोरट्यानी रोख रकमेसह सोन्याचे दागिने ऐवज चोरून नेल्याची घटना २१ रोजी घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असून तपास सुरु केला आहे.
सादिक बाबूलाल बागवान हे फळविक्री करून उदरनिर्वाह करतात. ते आणि त्यांची पत्नी हे दि. २० रोजी हज यात्रेला जाण्यासाठी निघाले. त्यांचे भाऊ फारुख बाबूलाल बागवान व नातेवाईक देखील त्यांना मुंबईपर्यंत सोडण्यासाठी सोबत गेले. मुलगा रिहानचा जळगावला पेपर असल्याने तो घराला कुलूप लावून जळगाव येथे गेला. दि. २२ रोजी रिहान घरी परत आला असता त्याच्या घराचे कुलुप तोडलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान, कपाटातील कपडे, वस्तू अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले.
सादिक आणि फारुख एकाच इमारतीत राहत असल्याने वरच्या मजल्यावरच्या कपाटातील साहित्य देखील फेकण्यात आले होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील, मिलिंद सोनार, अमोल पाटील, निलेश मोरे, जितेंद्र निकुंभे यांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच तातडीने ठसे तज्ञ व श्वान पथक बोलावण्यात आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघून चोरीचा तपास सुरू केला आहे.