जळगाव ( प्रतिनिधी ) – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर कारवाई करून तसा अहवाल सादर करावा असे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत

एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात २ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांबद्दल एक विधान केले होते . त्या विधानावरून ७ सप्टेंबर २०१७ रोजी अंजली दमानियां यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात एकनाथराव खडसे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती . पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने पुन्हा अंजली दमानिया यांनी २७ ऑक्टोबर राजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागितली होती. या तक्रारीच्या आधारावर आता राष्ट्रीय महिला आयोगाने जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. एकनाथराव खडसे यांच्यावर कारवाई करून तसा अहवाल सादर करावा असे ईमेलद्वारे पाठवलेल्या या पत्रात म्हटले आहे
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीणकुमार मुंडे यांनी सांगितले की पोलिसांनी ती रेक्रॉडींग आवाजाची क्लिप २०१९ साली नाशिकच्या फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवली होती. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अजून पोलिसांना मिळालेला नाही आम्ही अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत . तसा वस्तुनिष्ठ अहवाल आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाला २ दिवसात पाठवणार आहोत राष्ट्रीय महिला आयोगाचा मेल जिल्हा पोलीस दलाला मिळाला आहे
भोसरी भूखंड खटल्यात कोर्टाचे खडसे दाम्पत्याला समन्स
दरम्यान भोसरी भूखंड खटल्यात तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे पीएमएलए कोर्टाने एकनाथराव खडसे आणि मंदाताई खडसे यांना समन्स बजावले आहे. त्यांना गुरूवारच्या आधीच न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.
भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी खटल्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या पाठोपाठ तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर रवींद्र मुळे यांनी पीएमएलए कोर्टात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मुळे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी रवींद्र मुळे हे या व्यवहारात थेट लाभार्थी नसून ते ते चौकशीत सहकार्य करत असल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. यामुळे त्यांना जामीन मिळावा अशी विनंती त्यांनी केली यावर न्यायालयाने रवींद्र मुळे यांना सशर्त जामीन मंजूर केला. यात त्यांनी ईडीला चौकशीत सहकार्य करावे अशी अट टाकण्यात आली आहे. मुळे यांना त्यांचा पासपोर्ट देखील ईडीकडे जमा करावा लागला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत पीएमएलए न्यायालयाने माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना कोर्टासमोर हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे.







