जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात ३० डिसेंबर रोजी रात्री दोन गटात दगडफेक होऊन दंगल झाली होती. या दंगलीत जखमी झालेला शकील अली उस्मान अली (वय ३०, रा. शिवाजीनगर हुडको) या तरूणाचा गुरूवारी ६ जानेवारी दुपारी २ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सहा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवाजीनगर हुडको परिसरात ३० डिसेंबर रोजी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन दगडफेक होऊन दंगल झाली होती. घराबाहेर सुरू असलेल्या दंगलीत आपल्या भाच्याचा सहभाग तर नाही ना? अशा काळजीपोटी त्याला पाहण्यासाठी शकील अली उस्मान अली हा तरूण घराबाहेर आला असता त्याच्या डोक्याला दगड लागला त्यात तो खाली पडल्यामुळे डोक्याच्या मागच्या बाजुसही जबर दुखापत झाली. दोन दिवस खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर शकील घरी गेला होता. त्यानंतर बुधवारी ५ जानेवारी रोजी पुन्हा तब्बेत खालावल्याने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना गुरुवारी ६ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशी करण्याचे काम सुरू होते.