कैद्यांच्या पलायनप्रकरणी सातव्या आरोपीस अटक
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहातून दि. २५ जुलै रोजी ३ कैदी रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून फरार झाले होते. त्यांना पलायनास मदत करणाऱ्या चौघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित कैदयांना बोलण्यासाठी कारागृहामध्ये पौण्डस पावडरच्या डब्यात सिमकार्ड टाकून देणाऱ्या संशयित सागर उर्फ कमलाकर सुभाष (वय-२४) यास अमळनेरात त्याच्या राहत्या घराच्या तांबापुरा परिसरातून एलसीबीच्या पथकाने शिताफीने बुधवारी दि. २३ रोजी अटक केली आहे.
येथील जिल्हा कारागृहामध्ये सुशील मगरे, गौरव पाटील, सागर पाटील ह्या तीन कैद्यांनी २५ जुलै रोजी कारागृह रक्षक पंडीत दामु गुंडाळे याला डोक्यावर पिस्तूल लावून सकाळी ७. ३० वाजेच्या सुमारास पलायन केले होते. या प्रकरणात तिघंही कैद्यांना मदत करणारे जगदीश पाटील, नागेश पिंगळे, करण पावरा, अमित चौधरी यांना तसेच तिघांपैकी गौरव व सागर पाटील या कैद्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
तीनही कैदी फरार होण्यापुर्वी कैद्यांकडे मोबाईल आणि पिस्तूल कसे आले, याबाबत अटकेतील संशयित आरोपींकडून एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. कैदी गौरव पाटील याने कारागृहातून अमळनेर येथील मित्र नागेश मुकुंदा पिंगळे याच्या नावावर सिमकार्ड घेतले होते. हे सिमकार्ड पॉड्स पावडरच्या डब्यात कैद्यांपर्यंत पोहचविण्याच्या कामासाठी सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील हा त्याच्या दुचाकी क्रमांक – (एमएच १९ डीएन ४२५८) ने कारागृहात मदत केली, अशी माहिती मिळाल्यावर एलसीबीचे पथक त्याच्या मागावर होते. तो अनेक दिवसांपासून बाहेरगावी होता. तो अमळनेरात आल्याची माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी त्याला अटक करण्यासाठी स. फौ. नारायण पाटील, विजय पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, दीपक शिंदे, प्रवीण हिवराळे, दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरी आदींचे पथक तयार करून पाठविले. त्यानुसार बुधवारी दि. २३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात येऊन अटक करण्यात आली.
त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता. एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आता या प्रकरणात मुख्य सूत्रधार सुशील मगरे हा कैदी अद्याप फरार असून एलसीबीचे पथक त्याच्या मागावर आहे.