जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केलेलं आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावं या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्च्यातर्फ़े गुरुवारी २४ रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून नेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिके खराब झाली आहेत. काही शतकऱ्यांच्या घराची पडझड झाली आहे. याची नोंद घेऊन नैसर्गिक आपत्ती म्हणून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. पीकपेरानुसार पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, सचिन पानपाटील, गोपाळ भंगाळे, पाचोऱ्याचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे उपस्थित होते.