जळगावाच्या डॉक्टरांना १९ लाखांचा ऑनलाईन गंडा
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला, “मी ईडी ऑफिसमधून बोलतोय, मनी लॉन्ड्रींग मध्ये तुमचे बँक अकाऊंट आलेय..!” अशी बतावणी करून त्यापासून वाचण्यासाठी सातत्याने ऑनलाईन पैसे मागण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन या डॉक्टरांनी फिर्याद दाखल केली आहे. तब्बल १९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
शहरातील ५९ वर्षीय प्रतिष्ठित एका डॉक्टरांना दि. १ मे रोजी अंकुश वर्मा आणि सुनीलकुमार नामक व्यक्तींनी फोन केले. “आम्ही ईडीच्या ऑफिसमधून बोलतोय. मनी लॉन्ड्रींग मध्ये तुमचे बँक अकाऊंट आले आहे. त्यात तुमचा सहभाग आहे असे दिसतेय. त्यातून बाहेर पडायचे असेल तर आम्ही सांगू तसे वागा” असे या व्यक्तींनी डॉक्टरांना सांगितले. तसेच, संशयित आरोपींनी त्यांचे बँक अकाउंट नंबर पाठवून त्यात पैसे टाकण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या या डॉक्टरांनी वेळोवेळी दि. १ मे ते दि. १८ मे पर्यंत संशयितांच्या खात्यात एकूण तब्बल १९ लाख २० हजार रुपये पाठविले.
मात्र आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर मग या डॉक्टरांनी सोमवारी सायबर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर मंगळवारी दि. २१ मे रोजी त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष येऊन फिर्याद दाखल केली. दरम्यान, या डॉक्टरांचे देश विदेशातही रुग्ण असून ते जळगावातूनच औषध पाठवित असतात, अशी माहिती मिळाली आहे. संशयित आरोपी अंकुश वर्मा व सुनीलकुमार यांनी डॉक्टरांना पैसे मागण्यासाठी साधे व विडिओदेखील कॉल केले आहे. हे संशयित उत्तर भारतातील असण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपास आता सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत.
कोणाही व्यक्तीला जर अशा प्रकारचे कोणतेही फसवे कॉल आले तर त्याला उत्तर देऊ नका, आपली कुठलीही माहिती शेअर करू नका असे आवाहन सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी “केसरीराज” च्या माध्यमातून केले आहे.