ओळखणारे पोलीस २ मिनिटांत पळाले !!

आमदार मंगेश चव्हाण ट्रकचालक बनून स्टिंग ऑपरेशन !
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव – कन्नड मार्गावरील औट्रम घाटात ग्रामीण पोलिसांकडून सुरु असलेली अवैध वसुली आज आमदार मंगेश चव्हाण यांनी चव्हाट्यावर आणली . या स्टिंग ऑपरेशनसाठी आमदार मंगेश चव्हाण स्वतःच ट्रक चालक बनले . वसुलीसाठी गाडी थांबवलेल्या झिरो पोलिसाला त्यांनी ५०० रुपये देऊन बाकीचे पैसे परत मागितले . बाकी पैसे परत देणार नसल्याचे सांगत त्याने आमदारांना अरेरावी केल्यावर आमदारांनीही मग आपला इंगा दाखवला ! हे असे घडत असताना गस्तीसाठी नेमलेले आणि आमदारांना ओळखणारे पोलीस २ मिनिटात घटनास्थळावरून अक्षरशः पळून गेले ! आता सोशल मीडियावर या घटनाक्रमाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याने पोलीस खात्याचीच अब्रू वेशीला टांगली गेल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत .
महावसुली आघाडी सरकारच्या आशिर्वादाने चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात पोलीस ट्रकचालकांकडून कशा प्रकारे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खातरजमा करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी वेषांतर करत रात्री २ वाजता स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला, तेथे पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली त्यांनी थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले त्या पोलिसाने ते देण्यास नकार दिला आणि अरेरावीची भाषा आमदारांना सुनावली !
त्यानंतर ट्रक चालक बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला ! मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला.
सचिन वाझे जेलमध्ये गेल्याने १०० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी अशा वसुल्या सुरु आहेत, एकीकडे चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांची गुरे चोरीला जात असताना त्यांचा तपास आणि बंदोबस्त करायला पोलिसांना वेळ नाही, महावसुली आघाडी सरकार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहेत, १५ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाकडे कानाडोळा करतात मात्र पोलिसांच्या मार्फत महावसुली जोरात सुरु आहे , अशी टीका आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे .
या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद आहे मात्र पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा ५ ते १० तास ट्राफिक जामचा त्रास लोकांना सहन करावा लागतो , गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्स तासंतास अडकून पडतात, केवळ वसुलीसाठी प्रवाशांच्या जीवाशी सुरु असलेला हा खेळ आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करत उजागर केला आहे .







