जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे कारवाई
जळगाव : वाहनामधून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या तीन गुरांची पोलिसांनी सुटका करीत गुरांसह वाहन असा एकूण २ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार दि. ८ जून रोजी कुसुंबा येथे करण्यात आली. या प्रकरणी चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचोली ते जळगावच्या दरम्यान एका मालवाहू वाहनातून (क्र. एमएच १९, बीएम ३७४४) गुरांची वाहतूक होत असल्याचे एमआयडीसी पोलिसांना आढळले. हे वाहन थांबवून गुरांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी पोकॉ गणेश ठाकरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सैबाज अली जाकीर अली (रा. सुप्रिम कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.