भडगाव तालुक्यातील कजगाव येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कजगाव शिवारातील शेतकरी कैलास धरमचंद जैन यांच्या विजवितरण कंपनीच्या मागील बाजुस असलेल्या शेतात बांधलेल्या पशुधनावर हिंस्र वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात दोन गोहे ठार झालेत. तर एक पारडू गंभीर जखमी झाले.
ही घटना वन विभागास कळवल्यानंतर वन विभागाचे ज्ञानेश्वर भालेराव पाटील, अशोक पिरा महाजन यांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच वन्यप्राण्यांच्या उमटलेल्या पंजाची पाहणी केली. हा वन्यप्राणी नेमका कोणता, याबाबत माहिती मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या मते हा वन्यप्राणी आहे, तर वन कर्मचाऱ्यांनी बिबट्या असल्याच्या चर्चेला स्पष्टपणे नकार दिला. प्राण्यांवर हल्ला करणारा तडस किंवा अन्य हिस्स्र प्राणी असू शकतो, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या शेतात हल्ले करणाऱ्या वन्य प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.