जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नंदगाव येथे दोन गटात बुधवारी दिनांक ३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरुन तुफान हाणामारीची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांकडून दिलेल्या तक्रारीवरून एकमेकांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तब्बल २८ जणांवर बिएनएस कलम अंतर्गत ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२)१८९ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नाबाई रामनाथ पाटील (वय ४०, रा.नंदगाव) यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता, तुम्ही भुषण पाटील यांना का पकडून ठेवले आहे असे विचारल्याचा राग आल्याचा कारणावरुन फिर्यादीसह साक्षीदारांना मारहाण केली असल्याचे म्हटले आहे. तसेच संशयित आरोपींनी भुषण पाटील यांना पकडून ठेवत त्यालाही मारहाण केली. तसेच ‘आज तुम्ही वाचले, नंतर तुम्हाला आम्ही पाहून घेऊ’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर मुरलीधर धनराज सोनवणे (वय ५२, रा.नंदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेताच्या रस्त्यावरुन संशयित आरोपींनी माझ्यासह पत्नी व काकांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.
रत्नाबाई पाटील यांच्या फिर्यादीनुसार १२ जणांवर तर मुरलीधर सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार १६ अशा एकूण २८ जणांवर जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दीपक चौधरी हे करत आहेत.