जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील विकास दूध संघाच्या मालकीचा दूध पावडर ट्रकमध्ये भरून उत्तर प्रदेशातील लखनौ येथील इच्छित स्थळी न नेता दुध पावडर परस्पर विक्री करून अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवार दि. ११ जून रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील विकास दूध संघामध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ हे शहरासह इतर राज्यात देखील वितरण करण्यात येते. याच अनुषंगाने दूध पावडर देखील ट्रकच्या माध्यमातून विक्री केली जाते. दरम्यान दि. ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ९५७९) मध्ये विकास दूध संघाचे पावडर हे लखनौ येथे नेण्यासाठी चालक फिरोज सरजूद्दीन रा. आग्रा उत्तर प्रदेश आणि त्याच्यासोबत असलेला क्लीनर रुस्तम कमलेश बघेल रा. चतुर राज्य मध्यप्रदेश या दोघांवर विश्वास ठेवून दुध पावडरने भरलेला ट्रक त्यांच्या स्वाधीन केला.
दरम्यान या दोघांनी दूध पावडरने भरलेला ट्रक हा इच्छित स्थळी न नेता त्याची परस्पर विल्हेवाट लावून त्याचा अपहार केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मंगळवार ११ जून रोजी मध्यरात्री १ वाजता दोन जणांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भवारी हे करीत आहे.