नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपा नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. लेडी डॉन नावाने बनवलेल्या ट्विटर अकाऊंटवर भाजपाच्या सर्व नेत्यांची वाहने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हापूर पोलिसांनाही टॅग करण्यात आले आहे. मेरठ पोलिसांनी ट्विटरला पत्र लिहून लेडी डॉन ग्रुपची माहिती मागितली आहे.
लेडी डॉनने ट्विटरवर धमकीचा मेसेज दिला होता. ओवेसी तर फक्त मोहरा आहे. खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत. भाजपा नेत्यांच्या सर्व वाहनांवर आरडीएक्स हल्ला केला जाईल. बॉम्बस्फोटात सर्वांचा जीव जाईल,” असे या ट्विटमध्ये लिहिले आहे. या ट्विटनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
या ट्विटनंतर पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली. त्याचवेळी बॉम्ब निकामी पथकाने कार्यालयाची कसून तपासणी केली. एएसपी कँट सूरज राय यांचे म्हणणे आहे की, हे कृत्य काही असामाजिक तत्वांनी केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा, लखनऊ रेल्वे स्टेशन, गोरखपूर मठ बॉम्बने उडवून देण्याची धमकीही या ट्विटमध्ये देण्यात आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेनंतर ट्विटरने हे अकाउंट सस्पेंड केले आहे. सर्व पैलूंचा गांभीर्याने तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सुलेमान भाईने गोरखपूर मंदिरात ८ ठिकाणी बॉम्ब पेरल्याचे या धमकीमध्ये म्हटले आहे. यामध्ये भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीमा सिंह जिंदाबाद असेही लिहिले आहे. त्यानंतर पोलिसांनी दक्षता घेत गोरखनाथ मंदिराची तपासणी केली. मंदिराजवळील बंदोबस्त वाढवला आहे. लेडी डॉनच्या या अकाउंटवरून यापूर्वी ट्विट केले गेले होते. ज्यामध्ये इतर जिल्ह्यांना देखील टॅग केले गेले होते.