जळगाव ( प्रतिनिधी) — एमआयडीसीतून होत असलेली बायोडिझेलची तस्करी व निर्मितीचा सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी शुक्रवारी पर्दाफाश केला.एमआयडीतील जी सेक्टरमधील स्टील क्रॉप या कंपनीसह ऑटो नगरातील शांती निकेतन इमारतीनजीकच्या मोकळ्या मैदानात कारवाई करण्यात आली.
या दोन्ही कारवाईत आठ लाखाचे बायोडिझल, ट्रक व बायो डिझेल निर्मितीचे साहित्य असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजकुमार रवींद्र महाजन (वय २६,रा.शांतीवन सोसायटी, जगवानी नगर) व ट्रक चालक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील स्टील क्रॉप या कंपनीच्या परिसरात आर्या बायोडिझल या नावाने पंपावर अवैध बायोडिझलचा साठा असल्याची माहिती. मिळाल्यावरुन सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक फौजदार अतुल वंजारी, गोविंदा पाटील, गफूर तडवी, मुदस्सर काझी, सिध्देश्वर डापकर, महेश महाले व रवींद्र मोतीराया व पुरवठा तपासणी अधिकारी डिंगबर जाधव यांच्या पथकाने छापा टाकला.आर्या बायोडिझल जैविक इंधन असे पंपाचे इलेक्ट्रीक यंत्र आढळले. दोन्ही कारवाईत बायोडिझल, साहित्य व ट्रक मिळून १३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर जाधव यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत