औषधे घेत असताना दुचाकीच्या डिक्कीतून ८३ हजारांची रोकड लंपास
शेरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रकार; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव : औषधे खरेदीसाठी मेडीकलवर थांबलेल्या एका किराणा दुकानदाराच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने तब्बल ८३ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी मंगळवारी (दि. १०) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास काशिनाथ चौकातून शेरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भूमी हॉटेलसमोरील मेडीकल दुकानाजवळ घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर कॉलनीत राहणारे दीपक रमेशचंद गगराडे (वय ४३) यांचे संतोषी माता नगर येथे किराणा दुकान आहे. मंगळवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर दिवसभरातील गल्ल्यातील सुमारे ८३ हजार रुपयांची रोकड त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर (एमएच १९ सीएम ३०३८) क्रमांकाच्या दुचाकीने ते घराकडे निघाले. दरम्यान, शेरा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर भूमी हॉटेलसमोरील मेडीकलवर औषधे घेण्यासाठी ते काही काळ थांबले.
औषधे घेऊन घरी पोहोचल्यानंतर त्यांनी दुचाकीची डिक्की उघडून पाहिली असता, त्यामध्ये ठेवलेली ८३ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पैसे रस्त्यात पडले असावेत या शंकेने गगराडे यांनी पुन्हा त्याच मार्गावरून शोध घेतला; मात्र कुठेही रोकड सापडली नाही. त्यामुळे औषधे घेत असताना अज्ञात चोरट्याने हातचलाखीने डिक्की उघडून रोकड चोरून नेल्याची खात्री झाली.
यानंतर दीपक गगराडे यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार प्रमोद लाडवंजारी करीत आहेत. शहरात दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळी होणाऱ्या अशा चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.









