रिक्षात प्रवासादरम्यान वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोती लंपास
रेल्वे स्टेशन ते बस स्टँड दरम्यान प्रकार; दोन अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात दिवसाढवळ्या हातचलाखीचा प्रकार उघडकीस आला असून, रिक्षाने प्रवास करत असताना दोन अज्ञात महिला चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची दोन पोती लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ९८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. १३) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावती चुडामन वडीलकर (वय ५९, रा. न्यू पार्वती काळे नगर, जळगाव) या ६ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेरून बस स्टँडकडे जाण्यासाठी रिक्षा (क्र. एमएच १९-सीडब्ल्यू-३७७१) मध्ये बसल्या होत्या. त्याच रिक्षात त्यांच्या सोबत दोन अज्ञात महिला प्रवासी देखील बसल्या होत्या.
रिक्षा बस स्टँड परिसरात पोहोचल्यानंतर त्या दोन महिला तेथून खाली उतरून निघून गेल्या. काही वेळानंतर घरी पोहोचल्यावर सौ. वडीलकर यांच्या लक्षात आले की त्यांच्या गळ्यातील सोन्याची दोन पोती गायब आहेत. या दागिन्यांची किंमत अंदाजे ९८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अज्ञात महिला चोरट्यांनी फिर्यादीच्या नकळत व संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने हे दागिने चोरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सतीश पाटील करत आहेत.









