जळगावात इच्छादेवी चौकात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील ईच्छादेवी चौफुली शेजारी वाहनात गॅस रिफिलींग करतांना झालेल्या सिलींडरचा स्फोटात गंभीररित्या भाजलेल्या भरत सोमनाथ दालवाले (वय ५५, रा. यमुना नगर) यांचा उपचार सुरु असतांना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.
शहरातील यमुना नगरात राहणारे भरत दालवाले हे पुण्याहून आलेल्या नातेवाईकांना घेवून अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात जाण्यासाठी निघाले. परंतु वाहनात गॅस भरण्यासाठी चालकाने ईच्छादेवी पोलीस चौकीशेजारी असलेल्या गॅस रिफिलींग सेंटरवर गॅस भरण्यासाठी थांबला.(केसीएन)वाहनात गॅस भरत असतांना सिलींडरचा स्फोट होवून वाहनात बसलेल्या दालवाले कुटुंबातील सात जणांसह गॅस रिफिलींग करणारा व पोलीस कर्मचारी असे दहा जण गंभीररित्या भाजले गेले होते. यातील गंभीररित्या भाजले गेलेला रिफिलींग सेंटर चालविणारा दानिश शेख अनिस याचा मुंबई येथे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.
तर उर्वरीत जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेत डालवाले कुटुंबातील सात जण गंभीररित्या भाजले गेले होते.(केसीएन)यातील भरत दालवाले कुटुंबियातील सदस्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना गुरुवारी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांची आर्थीक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी जखमींना शनिवारी पुन्हा शासकीय रुग्णालयात हलविले. याठिकाणी भरत दालवाले यांच्यावर उपचार सुरु असतांना शनिवारी दुपारच्या सुमारास प्राणज्योत मालवली.
०००००००००००