जळगाव शहरातील मानराज पार्क येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : दररोज घरफोड्या, चोऱ्या यांच्या घटना आपण वाचत आहोत. ऐकत आहोत. चोरट्यांच्या वेगवेगळ्या कमाल देखील समोर येत आहे. अशाच एका चोरट्याने चक्क डीवायएसपी यांच्या अंगरक्षकाचीच दुचाकी डीवायएसपींच्या घरासमोरून चोरून नेल्याचे धाडस केले आहे. घटनेप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरालाल सिताराम गुमळकर (वय ४१, रा. पोलीस कॉलनी, जळगाव) यांची दुचाकी चोरीला गेली आहे. त्यांची नेमणूक डीवायएसपी आप्पासो पवार यांचा अंगरक्षक म्हणून करण्यात आलेली आहे. २७ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांच्यासोबत ड्युटीसाठी म्हणून ते पवार यांच्या घरी आले होते. त्यांच्या घरासमोर वृंदावन हॉस्पिटलला लागून त्यांनी दुचाकी क्रमांक एमएच १९ बीएक्स ५५९२ ही पार्क केली.
सकाळी सहा वाजेला ड्युटी वरून ते परतले असता त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी शोधाशोध केली. अखेर मंगळवार ३० मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहेत. दरम्यान डीवायएसपी पवार यांच्याच अंगरक्षकाची दुचाकी चोरीला गेल्यामुळे आता चोरट्यांनी गुन्हेगारीची मजलच मारली आहे.