भुसावळ आणि मनमाड पोलिसांची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ आरपीएफ पोलिसांना एक मोठी कारवाई करण्यामध्ये यश मिळाले आहे. बिहार राज्यातून पूर्णिया जिल्ह्यामधून ५९ मुलांना सांगली येथील मदरशामध्ये तस्करी करून नेत असताना भुसावळ आणि मनमाड स्थानकावर त्यांची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदरहू मुलांना जळगाव आणि नाशिक येथील बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले असून त्यांची काळजी घेण्यात येत आहे. कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर संबंधित बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली.
दानापूर-पुणे एक्सप्रेस रेल्वे नंबर ०१०४० यामध्ये बाल तस्करी होत असल्याच्या माहितीवरून आरपीएफ, जिआरपी या पोलिसांच्या संयुक्त टीमने धडक कारवाई केली. भुसावळ येथील एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने सदर एक्सप्रेस स्टेशनवर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून ८ ते १५ वयोगटातील २९ मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयीताला शिताफीने पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.
सदर एक्सप्रेस मध्ये पोलिसांची तपासणी सुरूच होती. मनमाडपर्यंत पुढील तपासणी दरम्यान शोध मोहीममध्ये आणखी ३० मुले आणि ४ संशयित तस्करांची ओळख पटली. त्यांना मनमाड स्टेशनवर ताब्यात घेण्यात आले आहे. भुसावळ येथे मिळून आलेल्या २९ मुलांना जळगाव येथील बाल निरीक्षण गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले असून मनमाड येथील ३० मुलांना देखील नाशिकच्या बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये सदर बालकांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. सदर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सदरहू पाचही संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली आहे.