पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवकाची फसवणूक
जळगाव (प्रतिनिधी) : पैसे तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवक विकास मच्छिंद्र पाटील यांची १६ लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तीन पोलिसांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले असून १६ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके (मुख्यालय) व पोकों दिनेश भोई (फैजपूर) या पोलिसांसह रक्कम घेऊन जाणारा नीलेश अहिरे याचे नाव निष्पन्न झाले. त्यावरून या चौघांसह आमिष दाखवणारा सचिन धुमाळ या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. ग्रामसेवक विकास पाटील यांच्या ओळखीतील सचिन धुमाळ याने रक्कम तिप्पट करण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार पाटील हे १६ लाख रुपये घेऊन जळगाव येथे आले. पाटील व धुमाळ यांनी ती पैशांची बॅगा रेल्वे स्थानकावर नीलेश अहिरे नामक एका व्यक्तीला दिले. काही वेळानंतर दोन पोलिस तेथे आले व अहिरे याला घेऊन गेले. ते पाहून आपली रक्कम गेली, असे सचिन धुमाळ सांगू लागला.
या नाट्यमय घटनाक्रमानंतर विकास पाटील यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासह शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुरुवातीला सचिन धुमाळ याच्यासह इतर तीन अनोळखी अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली.
तक्रारदार विकास पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. त्यामुळे जळगावात एका स्पर्धेदरम्यान त्यांची सचिन धुमाळ याच्याशी ओळख झाली. ते एकमेकांच्या संपर्कात आले व काही दिवसांपूर्वीच ते राजस्थान येथे फिरायला गेले होते. त्याच वेळी, माझ्याकडे एक जण रक्कम तिप्पट करुन देणारा असल्याचे धुमाळ याने सांगितले. घरी परतल्यानंतर तो याविषयी वारंवार विचारणा करू लागला. त्यानुसार विकास पाटील हे सोमवारी १६ डिसेंबर रोजी १६ लाख रुपये घेऊन जळगावात आले. त्यासाठी त्यांनी ग.स. सोसायटी येथून कर्ज काढले. येथे धुमाळ त्यांना भेटला व आपल्या बॅगेत २० लाख रुपये असल्याचे सांगत ते रेल्वे स्थानकावर गेले.
तेथे एक जण आला व तो बॅग घेऊन गेला. त्याच्या मागे हे दोघे जात असताना दोन पोलिस गणवेशात आले व ते बॅग घेऊन जाणाऱ्याला घेऊन गेले. पोलिस त्या व्यक्तीला पोलिस अधीक्षक कार्यालयात घेऊन गेल्याचे पाटील यांना सांगण्यात आल्याने ते व धुमाळ तेथे पोहोचले. मात्र तेथे पोलिसांनी कोणाला आणले नसल्याची माहिती मिळाली. पाटील यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. तसेच सोमवारी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुरुवातीला धुमाळ याच्यासह इतर तीन अनोळखी अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी कोणत्या पोलिस ठाण्याचे कर्मचारी रेल्वे स्थानकावर गेले होते का यासह वेगवेगळ्या मागनि तपास करण्यात आला. त्यात पोलिस उप निरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके (मुख्यालय) व पोकॉ दिनेश भोई (फैजपूर) तीन पोलिसांचा सहभाग असल्याचे समोर आले. तसेच रक्कम घेऊन जाणाऱ्या नीलेश अहिरे याचेही नाव निष्पन्न झाले. त्यावरून त्यांचा शोध घेत पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून १६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रकरणात मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस नाईक योगेश शेळके हाच या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.