पाच जण जखमी ; तणावपूर्ण शांतता
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात असणाऱ्या शिव मंदिरच्या ओटा बांधकामावर वाद उफाळला त्यामूळे दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास दगडफेक होऊन यात पाच जण किरकोळ जखमी झाले. याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तात्काळ घटनास्थळी एमायडीसी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,सुप्रीम कोलनी आणि पोलीस कॉलनी यांच्या मध्ये असणाऱ्या परिसरातील ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे ओट्याचे बांधकाम सुरू असताना सुमारे ४० ते ५० जणांचा जमाव मंदिरात येऊन त्यांनी बांधकामाला विरोध केला.यानंतर शाब्दिक चकमक होऊन काही वेळाने दगडफेक ला सुरुवात झाली.या दगडफेकीत रवींद्र राठोड,समाधान राठोड, साजन राठोड,पवन पाटील,,दीपक घुगे, श्रीकांतसिंग चौधरी आदी यावेळी जखमी झाले. घटनेची माहिती कळताच, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील,पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह एम आय डी सी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि दंगा नियंत्रक पथक दाखल झाले.त्यांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशा सूचना उपविभागीय अधिकारी संदीप गावित , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आदींनी दिल्या. यावेळी दोन गटातील समाजबांधव यावेळी उपस्थित होते.