चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी): नैसर्गिक मृत्यूला अपघाती मृत्यू दाखवून तब्बल ५० लाख रुपयांचा विमा लाटण्याचा धक्कादायक प्रयत्न मेहुणबारे पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, चार पोलीस कर्मचारी आणि मृताचे नातेवाईक अशा एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
मालेगाव येथील राजेंद्र जालिंदर जाधव यांचा मृत्यू २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या आजाराने झाला होता. मात्र, त्यांचा मृत्यू १९ एप्रिल २०२५ रोजी दहिंवद फाट्यावर कारच्या धडकेत झाला असल्याचा बनाव रचण्यात आला. या खोट्या अपघाताची नोंद मेहुणबारे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
मृताची पत्नी अरुणा जाधव यांनी ३ मे २०२५ रोजी एका खासगी इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाखांच्या विम्याचा दावा दाखल केला. विमा कंपनीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, राजेंद्र जाधव यांचा मृत्यू आधीच आजारपणामुळे झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, त्यांच्या घरातील फोटोवरही खरी मृत्यू तारीख नमूद होती. तपासात असेही उघड झाले की, मृताच्या नावावर विविध कंपन्यांच्या सुमारे १० विमा पॉलिसी काढून त्यावर दावे करण्याचा प्रयत्न झाला होता.


या प्रकरणी संशयित म्हणून डॉ. मंदार करंबळेकर वैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय, पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, सुनील निकम (मेहुणबारे पोलीस ठाणे), मृताची पत्नी अरुणा जाधव, भाऊ मिथुन जाधव आणि विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.









