जळगाव ( प्रतिनिधी ) – मेशो मार्केटिंग पोर्टलचा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे भासवून कासोदा येथील दुकानदाराची १ लाख ३७ हजार ५०० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाली आहे. जळगाव सायबर पोलीस स्थानकात मेशो ॲपच्या बनावट कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैय्यद हरशद अली अख्तर (वय ३०, रा. गौसिया नगर, मदिना मस्जिद जवळ कासोदा ता. एरंडोल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ मेरोजी मेशो ऑनलाईन खरेदी ॲपच्या बनावट कस्टमर केअरच्या मोबाईल क्रमांक ७६५३८९५२१९ वरून सैय्यद अरशद यांच्या मोबाईलवर फोन करून कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे भासवून अनिडेस्क नावाचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे सैय्यद अरशद यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून वेळोवेळी ऑनलाईन नेट बँकिंगद्वारे १ लाख ३७ हजार ५०० रुपये वळवून आर्थिक फसवणूक केली. जळगाव सायबर पोलिस स्थानकात मेशो कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोनि लीलाधर कानडे हे करीत आहेत.