भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील सुहास हॉटेलजवळील गल्ली परिसरात गुरुवारी सायंकाळी एसी दुरुस्ती कामासाठी जात असलेल्या मजुरावर काही इसमांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी अफताब अय्युब शेख (वय 30, रा. मुस्लिम कॉलनी, बडी खानका जवळ, भुसावळ) याने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार अफताब शेख हा एसी, फ्रिज दुरुस्तीचे काम करून उदरनिर्वाह करतो. गुरुवारी दिनांक ३०ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास तो मामेभावांसह वकार शेख आणि नबिल शेख होंडा स्पेल्डर (एमएच-४३ टी ९२३६) वर बसून नितीन बाबुराव करोसीया यांच्या घरी एसी दुरुस्तीकरिता जात होता.सुहास हॉटेलच्या बाजूच्या गल्लीत श्रीराम डेअरीसमोर जात असताना समोरून काळ्या रंगाच्या पल्सरवर दोन इसम आले आणि अफताब यांच्या दुचाकीला कट मारला. अफताब यांनी “ओ ओ” अशी हाक मारताच पल्सरवरील दोघे थांबले आणि वाद घालत शिवीगाळ सुरू केली. “तु आम्हाला ओळखतोस का?” असे म्हणत त्यांनी अफताब यांच्या मामेभावासही शिवीगाळ केली.
त्यानंतर एका इसमाने आपल्या मित्रांना फोन करून बोलावले.काही मिनिटांत चार-पाच इसम तिथे पोहोचले आणि अफताब व त्याच्या सोबत असणाऱ्या दोघांवर हल्ला केला. हल्लेखोरांपैकी एकाने हातात रुमाल बांधून अफताबच्या उजव्या गालावर, नाकावर आणि पाठीवर प्रहार केले. इतरांनीही चापटाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.भांडण सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या अफताबच्या मामेभावांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली व “आमच्याशी पुन्हा वाद केलास तर तुला मारून टाकू” अशी धमकी दिली. या झटापटीत अफताबच्या खिशातील १३ हजार रुपये रोख रक्कम हरवली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अफताब यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी मेमो देऊन त्यांना हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले.
अफताब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मारहाण करणाऱ्या व्यक्तींमध्ये एकाचे नाव सुरज टाक (रा. वाल्मिक नगर) असून त्याच्या सोबत दोन अनोळखी इसम होते. पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.









