जळगाव शहरातील शाहूनगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – नाशिक येथील तरुणाने मामाच्या मित्राचा विश्वास संपादन करून त्याच्याकडील मोबाईल ॲपचा वापर करत परस्पर कर्ज घेतले आणि दोन मोबाईल खरेदी करून ५८ हजार ६०५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शाहू नगरात समोर आला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वित्तपुरवठा कंपनीकडून कर्जाच्या हप्त्यासाठी वारंवार फोन आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी नासीर शेख निसार (वय २०, रा. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख शेख नजीर (वय ३२, रा. शाहूनगर) यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मित्राचा भाचा नासीर शेख याच्याशी त्यांची ओळख झाली होती. ओळखीनंतर नासीर हा शाहरुख यांच्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर नियमितपणे येऊन बसायचा आणि त्यांच्याशी गप्पा मारून त्याने हळूहळू शाहरुख यांचा विश्वास संपादन केला. याच दरम्यान, नासीरने शाहरुख यांचा मोबाईल फोन वापरण्यास सुरुवात केली.
या संधीचा गैरफायदा घेत नासीरने २१ फेब्रुवारी आणि २५ फेब्रुवारी रोजी शाहरुख यांच्या मोबाईलद्वारे परस्पर ऑनलाईन व्यवहार केले. त्याने एका खासगी वित्तपुरवठा कंपनीकडून कर्जाच्या माध्यमातून अनुक्रमे ३५ हजार ५४७ रुपये आणि २३ हजार ५८ रुपये असे एकूण ५८ हजार ६०५ रुपयांचे दोन महागडे मोबाईल फोन खरेदी केले. शाहरुख यांना या व्यवहारांची कोणतीही माहिती नव्हती.फसवणूक झाल्याचे तेव्हा उघडकीस आले, जेव्हा वित्तपुरवठा कंपनीकडून शाहरुख यांना कर्जाच्या हप्त्यांसाठी वारंवार फोन येऊ लागले.
सुरुवातीला शाहरुख यांना काहीच कळेना, परंतु जेव्हा त्यांनी चौकशी केली, तेव्हा नासीरने त्यांच्या मोबाईल ॲपचा वापर करून परस्पर कर्ज घेतल्याचे आणि दोन मोबाईल खरेदी केल्याचे समोर आले. आपल्याच विश्वासातील व्यक्तीने फसवणूक केल्याचे कळताच शाहरुख यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नासीर शेख निसार याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.