वैद्यकीय शिक्षण विभागाने कर्तव्यदक्ष अधिष्ठात्याला पाठवले मूळ पदस्थापनेवर
डॉ. जयप्रकाश रामानंद यांची पूर्वीच्या जागी धुळ्याला नियुक्ती
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष व शिस्तबद्ध अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य खात्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशावरून त्यांच्या मूळ पदस्थापनेवर परत पाठवले आहे. तर अलिबाग येथे असलेले उप अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तात्काळ पदभार सुपूर्द करण्याबाबत डॉ. रामानंद यांना आदेश करण्यात आले आहे.
अगदी कठीण काळात कोरोनाच्या महामारीमध्ये अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा भार सांभाळला होता. अगदी शिस्तबद्ध व नियोजनबद्ध कारभार करत रुग्ण व नातेवाईकांना त्यांनी आपलेसे केले होते. या रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांचे रुग्णालयात येण्याचे प्रमाण वाढले होते.
सुरुवातीला १३ जून २०२० ला रुजू झाल्यानंतर डॉ.रामानंद यांच्याकडून ७ सप्टेंबर २०२१ रोजी पदभार काढून घेत डॉ. फुलपाटील यांच्याकडे देण्यात आला होता. तिनच महिन्यात रुग्णालयाचा कारभार ढासळल्यामुळे त्यानंतर परत ३१ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाने अधिष्ठाता पदाचा कार्यभार सुपूर्द केला होता. डॉ. रामानंद यांनी रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा शिस्तबद्ध करीत डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले होते.
अशा परिस्थितीमध्ये मात्र आता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री जळगाव जिल्ह्याचे गिरीश भाऊ महाजन असताना कर्तव्यदक्ष डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांना मूळ पदस्थापनेवर परत पाठवण्यात आले आहे. सध्या मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा रुग्णालय व महाविद्यालयाला जाणवत आहे. सहा विभागांना तर विभाग प्रमुखच नाही. परिचारिकांची संख्या तोकडी आहे. यासह काही इतर समस्या देखील रुग्णालयात आहेत. मात्र डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सर्व परिस्थिती यशस्वीपणे हाताळून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना न्याय देत आहेत. अशा परिस्थितीत गिरीश महाजन यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते असल्याने त्यांनी स्वतःच्या “होमपीच” असलेल्या जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची पदस्थापना थांबवण्याची गरज आहे.
नवीन येणारे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर हे मूळचे लातूर वैद्यकीय महाविद्यालयातील असून त्यांना अलिबाग येथे उप अधिष्ठाता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ते कान नाक घसा शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी जळगाव अधिष्ठाता पदाचा पदभार घेतल्यावर त्यांच्यासमोर डोंगरभर समस्यांचे आव्हान उभे राहणार आहे.