मुकबधिर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास

विशेष पोक्सो न्यायालयाचा निकाल; पीडितेला दंडातील ७ हजार रुपये देण्याचे आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय मुकबधिर अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपी दीपक नाना भिल (वय २६, रा. ता. अमळनेर) याला दोषी ठरवले असून, त्याला २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाच्या रकमेपैकी ७ हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपी दीपक भिल याने त्याच गावातील मुकबधिर अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारांमुळे पीडित मुलगी गर्भवती झाली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी दि. ३० जानेवारी २०२२ रोजी अमळनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर हा खटला अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश एल. डी. गायकवाड यांच्या विशेष पोक्सो न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद करत एकूण ९ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर सादर केल्या.
पीडित मुलगी ही विशेष बालक असल्याने तिची साक्ष बंद खोलीत व्हिडिओग्राफीद्वारे नोंदवण्यात आली. तिच्यासाठी विशेष शिक्षक-दुभाषिकांची नियुक्ती करण्यात आली होती. साक्षीदरम्यान पीडित मुलगी साडेपाच महिन्यांची गर्भवती होती. पीडितेची आई, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील, तसेच डॉ. अनिता देशमुख यांच्या साक्षी या प्रकरणात महत्त्वाच्या ठरल्या.
सर्व पुरावे आणि साक्षींचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपी दीपक भिल याला दोषी ठरवले.









