जळगाव ( प्रतिनिधी ) – काल जळगावात पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरु असताना हाय टेक कॉपिचा सर्वांना आश्चर्यचकित करणारा नवा अविष्कार उघडकीस आला . डेबिट कार्ड वापरून तयार केलेले हे उपकरण नव्या चर्चेचा विषय ठरले आहे.

यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी सांगितले की , परीक्षा सुरु होण्यापूर्वी पोलिसांना सर्वांच्या काटेकोर तपासणीचे आदेश देण्यात आले होते. ही तपासणी करताना हा प्रकार पोलिसांना लक्षात आला. प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्यापूर्वी या संशयित उमेदवाराने २ ते ३ वेळा बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला होता. त्यामुळे परीक्षा सुरु होण्यापूर्वीच त्याचे हे कारस्थान लक्षात आले होते . त्याने एटीएम किंवा डेबिट कार्ड वापरून त्याच्या मागे पातळ थराचे उपकरण जोडले होते आणि ते आपल्या गुडघ्याभोवती नी – कॅप वापरून गुंडाळले होते सोबत त्याने कुणालाही सहज दिसणार नाही असे कॅप्सूल ब्लु टूथ हे उपकरण आपल्या कानात लपवलेले होते चिमटा वापरून त्याच्या कानातून हे कॅप्सूल ब्लु टूथ काढावे लागले होते.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा केंद्रात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. योगेश रामदास आव्हाड (रा.पांझनदेव, पोस्ट.नागापूर ता. नांदगाव) या परीक्षार्थी तरुणाने परीक्षा केंद्रात नजर चुकवून ही उपकरणे आणली होती.
या परीक्षार्थी तरुणाने परीक्षा केंद्रात नजर चुकवून मोबाईल आणला होता. योगेशने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मित्राला पाठवली. त्यानंतर त्याच्या मित्राने प्रश्नांची उत्तर सोडवून त्याला पाठवायला सुरुवात केली. हा प्रकार सपोनि देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर योगेशला परीक्षा केंद्राच्या बाहेर नेत चौकशी करण्यात आली. योगेश रामदास आव्हाड आणि त्याचा मित्र (नाव निषपन्न नाही) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.







