जळगाव शहरात कोल्हे हिल्स परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – रात्रीच्या वेळी बंद असलेल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून चोरट्यांनी संगणकाचे तीन संच चोरून नेले. ही घटना दि. १४ जून रात्री ते १५ जून रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धीविनायक चौकामध्ये मनीषा विशाल पाटील (वय ४३) यांचे घराशेजारीच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असून, तेथे मुलांचे क्लास घेतले जातात. दि. १४ जून रोजी रात्री ८ वाजता इन्स्टिट्यूट बंद केले होते. मध्यरात्री चोरट्यांनी इन्स्टिट्यूटच्या दरवाजाचा कडीकोयंडा कापला. आतमध्ये प्रवेश करून ३ मॉनिटर, ३ सीपीयू, ३ की बोर्ड, ३ माऊस व केबल आदी साहित्य चोरून नेले. दि. १५ रोजी सकाळी सात वाजता हा प्रकार लक्षात आला.
या प्रकरणी मनीषा पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत. चोरी झाली त्या परिसरात एका जणाकडे सीसीटीव्ही लावलेले आहे, मात्र ते बाहेरगावी गेलेले असल्याने फुटेज मिळू शकले नाही.