जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या कापूसवाडी येथील एका शेतकऱ्याने शेतातील पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून पिकांच्या आजुबाजूला झटका मशीनचे तार कंपाऊंड लावलेले आहे. या झटका मशीन यंत्राच्या तारेचा जबर झटका शेताची रखवालीसाठी जाणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीस लागल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलिसांनी शेतकऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
कापूसवाडी येथील शेतकरी दिपक जगन तेली यांनी कापूसवाडी शिवारातील आपल्या शेतातील पिकांचे जंगली प्राणी व गुरांपासून संरक्षण व्हावे यासाठी शेताला झटका यंत्र लावलेले होते.(केसीएन)या ठिकाणी त्यांनी कोणताही धोका आहे असे सुचना फलक अगर धोका दर्शविणारे इंडीकेटर न लावता हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे आता गुन्हा दाखल झाला आहे. या झटका यंत्राच्या तारेचा जबर झटका दि.५ मार्चच्या रात्री जमिनीची रखवाली करण्यासाठी जाणाऱ्या मधुकर पुंडलीक माळी (वय-५३, रा. कापूसवाडी) यांना बसला.
मधुकर माळी यांचा पाय शेतातील बांधावरील झटका यंत्रातील तारेत अडकला आणि त्यांना यंत्राचा जबर झटका बसल्याने त्यांचा जागेवर मृत्यु झाला आहे, याबाबतची फिर्याद त्यांची पत्नी मंजुळाबाई मधुकर माळी यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलीसांनी संशयित आरोपी दिपक जगन तेली यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचा तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक गणेश फड यांचे मार्गदर्शना खाली पोहेकॉ सचीन पाटील हे करीत आहे.