चोरटा सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात कैद
जळगाव (प्रतिनिधी) – येथील एमआयडीसी परिसरातील स्वामी पॉलीटेक या कंपनीमध्ये अज्ञात चोरट्याने कंपनीच्या संचालकाच्या कक्षात घुसून तोडफोड करीत १२ लाख ६८ हजार रुपयांची धाडसी चोरी केल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते ३. ३० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटा सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
गोदडीवाला हौसिंग सोसायटी, मोहाडी रोड येथील रहिवासी भरत हरिशकुमार मंधान (वय-३५ वर्ष) या व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एमआयडीसीमध्ये सेक्टर व्ही – २३ येथे स्वामी पॉलीटेक ही प्लास्टिक मोल्डेड फर्निचर बनविण्याची कंपनी आहे. कंपनीचे कामकाज भरत मंधान त्यांचा लहान भाऊ सागर व मावस भाऊ वासुदेव पमनानी हे चालवितात. कंपनीत १ ऑक्टोबर रोजी दिवसभरात फेरीवाल्यांना प्लास्टिक मोल्डेड फर्निचरची विक्री करून आलेले पैसे हिशोब करून मावसभाऊ वासुदेव पमनानी याच्या कॅबिनमध्ये रुपये १२ लाख ६८ हजार रुपये ठेवलेली पिशवी छोट्या कपाटात ठेवली होती. त्याच्या चाब्या रात्रपाळीचा वॉचमन रामभाऊ पाटील यांच्याकडे दिल्या होत्या. शक्रवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ऑफिसबॉय मिनास सैय्यद याने फोन करून वासुदेव पमनानी यांच्या कक्षातील खुर्च्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्याचे सांगितले.
फिर्यादी भरत मंधान, सागर व वासुदेव पमनानी हे लागलीच कंपनीत गेले. त्यांनी कॅबिन उघडून पहिले असता, कपाट उघडे व लॉक तुटलेले दिसले. पैशांची पिशवी दिसली नाही. ड्रॉवरचे लॉक तुटलेले व उघडे दिसले. टेबलावर मोठा स्क्रूड्राईवर, हमालीचा हुक पडलेला तसेच ठिकठिकाणी बुटाचे ठसे दिसले. तातडीने
सी.सी.टीव्ही फुटेज तपासले असता त्यात कंपनीतील ऑपरेटर भालचंद्र यादव आणि हेल्पर सचिन शर्मा हे २ ऑक्टोबरच्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास येतांना व एकाच मिनिटात ते परत जातांना दिसले. नंतर २ वाजून ४१ मिनिटांनी अनोळखी इसम तोंडाला मास्क लावलेला दिसून आला. त्याच्याकडे स्क्रूड्राईवर होता तो वासुदेव पमनानी यांची कॅबिन उघडण्याचे प्रयत्न करीत होता. दरवाजा न उघडल्याने त्याने बाजूच्या कक्षामधून पमनानी यांच्या कॅबिनमध्ये उडी मारून आत शिरला. ३. ३१ वाजता पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन बाहेर जातांना दिसला. फुटेज नुसार भालचंद्र यादव याची चौकशी केली असता मशीनचे ब्लेड तुटले असल्याने ते घ्यायला ऑफिसमध्ये आल्याचे त्याने सांगितले.
घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी भेट दिली. चोरट्याच्या शोधकामी सफौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, जितेंद्र राजपूत, मुकेश पाटील, चंद्रकांत पाटील, हेमंत कळसकर, मुदस्सर काझी, विजय बावसकर यांचे पथक नेमण्यात आले. पुढील तपास सपोनि. अमोल मोरे करीत आहेत.