राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघात गंभीर प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील पहूर येथे ग्रामीण रुग्णालयात झालेल्या सरकारी शिबिरात रुग्णांकडून दोन हजार रुपये घेतल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी पाच सदस्यीय समिती नेमली आहे. या चौकशीत नेमके काय सत्य बाहेर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
पहूर येथे लॅप्रोस्कोपिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालयात दि. ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. शिबिरात १०७ लोकांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली. हे शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. शिबिराला नाशिक येथील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. वर्षा लहाडे यांनी जिल्ह्यातील डॉ. जयश्री पाटील व डॉ. संदीप कुमावत यांच्या मदतीने बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या.
शिबिरामध्ये रुग्णांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याचा आरोप खुद्द ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत अरविंद देशमुख यांनी करीत तसा तक्रार अर्ज देखील पहूर पोलीस स्टेशनला दिला आहे. त्यानुसार केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासून व चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलीस देखील चौकशी करीत आहेत.
या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी “केसरीराज”शी बोलताना सांगितले की, सदर प्रकार हा गंभीर आहे. या प्रकरणी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, डॉ. बिराजदार यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. सदर समिती या प्रकरणाचा तपास करीत आहे. चौकशी समितीत जे सत्य बाहेर येईल व जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही डॉ. भायेकर यांनी सांगितले आहे.
मात्र सदर पैसे घेण्याचा प्रकार गंभीर असून त्याबाबत सत्य बाहेर येण्याची मागणी रुग्णांकडून केली जात आहे.