जळगाव(प्रतिनिधी)- येथील काँग्रेस भवन येथे रविवारी २० रोजी जिल्हा युवक काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना फिजिकल डिस्टंसिंग म्हणजेच शारीरिक अंतर राखण्याचा तसेच मास्क घालण्याचा देखील विसर पडल्याचे स्पष्ट दिसून आले.

मेळाव्यामध्ये मंचावर असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील अनेकवेळा मास्क काढले होते. सुमारे ५० ते ६० जण या मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्यामध्ये बसण्यासाठी लावलेल्या खुर्च्यांमध्ये देखील कुठलेही अंतर राखले गेले नाही, तसेच मेळाव्यात निर्जंतुकीकरणासाठी सॅनेटाईझर दिसले नाही. करोना साथ रोगाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांनी मास्क, शारीरिक अंतर, हात धुणे याचा अवलंब करावा, असे वारंवार जिल्हाप्रशासनाने सांगितले आहे. मात्र, काँग्रेसच्या मेळाव्यात सर्व नियमांना तिलांजली दिली गेली. सत्तेत असलेला पक्ष जर असा बेजाबदारपणे वागत असेल तर, सामान्य नागरिकांना या पक्षाला कोरोनाविषयी उपदेश देण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.







