जळगाव (प्रतिनिधी) – केंद्रातील भाजपाच्या सरकारने शेतकर्यांचे कंबरडे मोडण्यासाठी तीन विधेयके आणि कामगारांचे हातातून काम हिरावून घेण्याचे विधेयके मंजूर केल्याने शेतकरी आणि कामगार यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी व कामगारांना उद्ध्वस्त करणार्या केंद्र शासनाच्या विरोधात 2 कोटी सह्यांची मोहीम जिल्हा कमिटी राबविणार असून त्या सह्यांचे निवेदन प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी काँग्रेस भवनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रभारी यांच्यासमवेत एक विशेष बैठक 21 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती.या बैठकीत शेतकरी विरोधी विधयके व त्याविरोधात संघर्ष करणार्या शेतकर्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 24 सप्टेंबरपासून देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम, यूट्यूब आदी सोशल मीडियाद्वारे संदेश दिला जात आहे. राज्यस्तरीय किसान संमेलन तसेच 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान शेतकरी, शेतमजूर, बाजार समितीतील दुकानदार, बाजार समितीमधील कामगार, कष्टकरी यांच्या सह्यांची मोहीम राबवून 2 कोटी सह्यांचे निवेदन प्रदेश कमिटीकडे देण्यात येणार असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले.