जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवार दि. ३ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला आहे.
मोहित दीपक गादिया (वय २६, रा. नवी पेठ, जळगाव) असे जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कनिष्ठ निवासी म्हणून सेवा देत आहेत. दरम्यान, शुक्रवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी भादली येथे फटाका फुटल्यामुळे किरकोळ जखमी झालेले चार संशयित महिला व पुरुष हे रुग्णालयात उपचारासाठी आले होते. (केसीएन)त्यावेळेला रुग्णांच्या नातेवाईकांनी गर्दी केल्यामुळे डॉ. मोहित गादिया व इतर सहकाऱ्यांनी त्यांना, “येथे गर्दी करू नका. बाहेर जा. आम्हाला ट्रीटमेंट करू द्या” असे सांगितले. त्याचा राग आल्याने नातेवाईकांनी डॉ. मोहित गादिया यांच्या कानशिलात लगावली. तसेच त्याला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या वेळेला इतर सहकाऱ्यांनी धाव घेत डॉ. मोहित यांना नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले. यानंतर रुग्णालयात जमाव जमा होत असल्याचे पाहून रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला घेऊन खाजगी दवाखान्यात निघून गेले. घटनेची माहिती काढताच जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी रुग्णालयात आले.तसेच डॉ. मोहित गादिया यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, कानशिलात लगावल्यामुळे डॉ. मोहित गादिया यांच्या कानाचा पडदा फाटला असून काही आठवडे त्यांना आराम करावा लागणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपत्कालीन विभागाजवळच पोलीस चौकीची उभारणी केली आहे. मात्र या चौकीमध्ये पोलीस कायमस्वरूपी दिसत नाही.(केसीएन)त्यामुळे डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार घडतात अशी माहिती निवासी डॉक्टरांनी दिली. दरम्यान यापूर्वी देखील शल्यचिकित्सा विभागातील डॉ. जैद पठाण व डॉ. अभिनय यांना मारहाण करण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्या डॉक्टरांवर हल्ला झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.
दरम्यान, रुग्णालयात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष चव्हाण व सहकाऱ्यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतलीm तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळेला निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांना निवेदन देऊन आम्हाला कायमस्वरूपी सुरक्षा पुरवावी यासंदर्भात निवेदन दिले. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.