पारोळा शहरातील अशोक नगरातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- येथील अशोक नगर परिसरात बंद घराच्या कडीकोंडा तोडून चोरट्यांनी रोकडसह दागिने असा १ लाख ५ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना दि २ ते ३ नोव्हेंबर दरम्यान घडली. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विलास भिकनराव पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांचा परिवार दिवाळीनिमित्त बाहेर गावी गेला होता तर ते कामानिमित्त बाहेर होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजाच्या कडीकोंडा तोडून आतील कपाटाचे लॉक तोडून त्यातील ४० हजार किमतीची सोन्याची चैन, २० हजार किमतीची सोन्याची अंगठी व ४५ हजार रुपये रोख असे एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत एक नव्हे तर तीन घरांमध्ये चोरी केली. विलास पाटीलसह विजय मिस्तरी व दत्तात्रेय चौधरी यांच्या घरात देखील चोरट्यांनी प्रवेश करत कपाटाचे लॉक तोडून चोरी केली. घटना कळताच पोलिसांनी भेट दिली. यावेळी श्वानपथक व फिंगरप्रिंट पथक यांनी घटनास्थळी चाचपणी केली. एका ठिकाणी चोरटा हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याबाबत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तपास स.पो.निरीक्षक योगेश महाजन करीत आहे.