जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. तर दुसरीकडे चोरट्यांच्या उपद्रवाने त्रस्त देखील आहे. तालुक्यातील लोंढरी शिवारातील ३ शेतकरी बांधवांच्या शेतातील १ लाख १० हजार रुपये किमतीच्या ठिबक नळ्या अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.
लोंढरी येथील प्रकाश रामचंद्र गव्हाळे, विलास रामचंद्र गव्हाळे, अशोक माधवराव पांढरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यांची शेती मोतीआई मंदिराजवळ असून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतात जमा केलेले ठिबक नळ्या लंपास केल्याचे शेतात गेले असता निदर्शनास आले. प्रकाश गव्हाळे व विलास गव्हाळे यांचे प्रत्येकी २ एकर क्षेत्रातील ६० हजार रुपये किंमतीचे ठिबक, तसेच अशोक पांढरे यांच्या ४ एकर क्षेत्रातील सुमारे ६० हजार रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या.
याप्रकरणी चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी शेतकरी बांधवांनी पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्याकडे केली आहे. दरम्यान सहाय्यक फौजदार रविंद्र देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर चोरट्यांना शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.