चोपडा तालुक्यातील वडगाव शिवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- मकाच्या पिकाची लागवड केलेल्या शेतामध्ये अनधिकृतपणे शिरून चोरट्यांनी सुमारे १ लाख रुपये किमतीचे मका कणसे कापून चोरुन नेले. तालुक्यात वडगाव शिवारात ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी बुधवार दिनांक २३ रोजी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
संजय श्रीकृष्णदास समदाणी (वय ५३, रा. भातखेडे बुद्रुक ता. भडगाव) यांच्या मालकीचे वडगाव ता.चोपडा शिवारात शेत गट नं. २१५/२ मध्ये १ हेक्टर २० आर या क्षेत्रात मका पेरला होता. चोरट्यांनी या शेतात शिरुन तब्बल १०० क्विटंल वजनाचे कणसे कापून चोरुन नेले. याचे बाजारमुल्य सुमारे १ लाख रुपये आहे.
ही माहिती कळताच संजय समदाणी यांनी शेतात धाव घेत पिकाची पाहणी केली असता मकाचे सर्व कणसे कापून नेल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी तक्रारीनुसार अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी शिवारात जावून पाहणी केली. गुन्ह्याचा तपास पोहेकॉ अन्वर तडवी हे करीत आहेत.