भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची कारवाई
भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथील बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल १६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमधून एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल वाघ व त्यांच्या पथकाने केली. २२ ऑगस्ट रोजी रेल्वेस्टेशनजवळील एटीएम समोरून दुचाकी चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासदरम्यान तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी विक्रम ऊर्फ काल्या केसरसिंग बारेला (२०, रा. मध्य प्रदेश) याला शाहपूर येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार राहुल रितेश चव्हाण (१८, रा. जयभीमनगर, शाहपूर, बऱ्हाणपूर म. प्र.) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांच्या कसून चौकशीत आरोपींनी एकूण १६ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणांहून दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांचे मार्गदर्शन लाभले. पथकात पोहेकॉ विजय नेरकर, पोना सोपान पाटील, पोकॉ योगेश माळी, भूषण चौधरी, प्रशांत सोनार, महेंद्रसिंग पाटील, अमर अढाळे, किरण धनगर, रवींद्र भावसार, सचिन चौधरी, जावेद शहा आदींचा समावेश होता.