जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलीस दलाने गेल्या कार्यकाळात अत्यंत धाडसी कारवाया करीत अनेक गुन्ह्यांच्या उकल करीत आरोपींकडून मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवारी २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला. अनेक वर्षानंतर किंमती वस्तू परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी आभार मानले. गहाळ व चोरी झालेले ११५ मोबाईल, दोन चोरीच्या दुचाकी आणि चैन स्नॅचिंगमध्ये गेलेली सोन्याचे चैन आदी मुद्देमाल परत करण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदार आणि मूळ मालक यांना संबंधित मुद्देमाल देण्याचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात मंगलम हॉलमध्ये शुक्रवारी घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.