सावखेडा शिवार परिसरातील घटना
जळगाव प्रतिनिधी : शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, सावखेडा शिवार परिसरातील लेण्याद्री कॉलनीतील एक बंद घर फोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी निलेश परमेश्वर राजपूत (वय ४३, रा. मोहाडी ता. जामनेर, ह.मु. सावखेडा शिवार) हे गेल्या एक वर्षापासून जळगाव येथील लेण्याद्री कॉलनीतील गट नं. १६०, प्लॉट नं. ३९ मधील घरात वास्तव्यास आहेत. दि. १५ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ते आपल्या घराला कुलूप लावून शेतीच्या कामासाठी मूळ गावी मोहाडी येथे गेले होते. दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या किशोर पाटील यांनी फोन करून माहिती दिली की, त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले असून दरवाजा उघडा आहे. निलेश राजपूत यांनी तातडीने नातेवाईकांसह घरी धाव घेतली असता, घराचा कडीकोंडा कापलेल्या अवस्थेत दिसून आला.









