पारोळा (प्रतिनिधी ) – तालुक्यातील भिलाली येथील मंदिराची दानपेटी व पाच घरे चोरट्यांनी फोडून तीन लाखाचा मुद्देमाल लांबविल्याची घटना ९ रोजी रात्री घडलीय. दरम्यान, चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
९ रोजी मध्यरात्री विशाल पाटील, लोटन पाटील, रवींद्र पाटील, शंकर पाटील यांच्या घरांसह संत सोनगीर महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली. त्यात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही तीन चोरटे कैद झाले आहे.
पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र चोरट्यांचा थांगपत्ता लागला नाही . सहा महिन्यांपुर्वी ग्रामीण भागात पशुधन चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यांचा उलगडा होत नसताना आता चार दिवसांत तालुक्यात १० घरफोड्या झाल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिले अाहे.