गलंगी ते हातेड रस्त्यावर घटना
चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील गलंगी ते हातेड रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात ६३ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चालकाने दुचाकी बेजबाबदारपणे चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचा ठपका ठेवत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पृथ्वीराज मुकुंदा केदार (वय ६३, रा. चौगाव, ता. चोपडा) हे दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास कामावरून घरी परतत होते. यावेळी ते संशयित आरोपी बापू शालिक धनगर (रा. चौगाव) याच्या एमएच १९ डीझेड ४७६७ क्रमांकाच्या मोटारसायकलवर मागे बसलेले होते. गलंगी ते हातेड दरम्यान निलेश वासुदेव महाजन यांच्या शेताजवळ आले असता, चालक बापू धनगर याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपली दुचाकी अतिशय वेगात आणि निष्काळजीपणे चालवली. यामुळे अचानक दुचाकी घसरली आणि मोठा अपघात झाला.
या अपघातात पृथ्वीराज केदार यांच्या शरीराला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दुर्दैवाने, या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताला पूर्णतः दुचाकी चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मयत पृथ्वीराज यांच्या पत्नी शोभाबाई पृथ्वीराज केदार (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयित आरोपी बापू शालिक धनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत मोहन कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









