एरंडोल तालुक्यातील उमर्दे रस्त्यावरील घटना ; २ जखमी
एरंडोल (प्रतिनिधी) : मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना भरधाव वेगातील कार पुलाच्या भिंतीवर आदळून खाली कोसळली. या भीषण अपघात चोपडा येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. ८ मे रोजी रात्री ११ वाजता उमरदे गावाजवळ घडली.
दीपक अरुण मराठे (रा. मल्हारपुरा, चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. दीपक हा पारस महाजन (रा. चोपडा) आणि मोहित नाथबुवा (रा.धरणगाव) हे तिघे त्यांचा मित्र चेतन वानखेडे यांच्या बहिणीच्या हळदीसाठी बिलवाडी ता. जळगाव येथे चारचाकी क्रमांक (एम.एच.१२ ए.एन.५३४६) ने निघाले होते. एरंडोल-म्हसावद रस्त्यावरील उमरदे पुलाच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलाच्या कठड्यावर आदळून खाली कोसळली व उलटली.
या अपघातात दीपक मराठे याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर उमरदे गावातील स्थानिकांनी तत्काळ मदतीस धाव घेतली व जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एरंडोल पोलिस करत आहेत.