चोपडा तालुक्यातील घुमावल येथील घटना ; तिघांना अटक
पोलिसांनी तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याने नातेवाईकांचा रोष
चोपडा (प्रतिनिधी) : पूर्व वैमनस्यातून एका १७ वर्षीय तरुणाला तिघांनी धमक्या देणे तसेच मानसिक त्रास देणे सुरू ठेवले होते. अखेर या धमकीला व त्रासाला कंटाळून मुलाने सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी सुसाईट नोट जात केली असून याप्रकरणी तीन जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश रेवानंद पाटील (वय १७, रा. घुमावल खु. ता. चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी महेंद्र एकनाथ पाटील (वय ३८), मनोज पंढरीनाथ पाटील (वय ४२) व पवन मगन पाटील (वय २९, सर्व रा. घुमावल बु.) यांना अटक करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील घुमावल बु. येथे मंगेश पाटील हा वास्तव्यास होता. २०१८ मध्ये मंगेशचे काका वसंत पाटील यांनी लोकनियुक्त संरपंच पदाची निवडणूक लढविली होती. यात संशयितांचे काका सदाशिव दंगल पाटील यांच्या विरोधात फक्त १८ मतांनी विजयी झाले होते. तेव्हा पासुन त्यांच्या मनात राग होता.
तसेच मंगेश पाटील हा महेंद्र पाटील यांच्या मुलीशी शाळेच्या बस स्टॉपवर बोलत असतांना महेंद्र एकनाथ पाटील यांनी पाहिले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या बोलण्याचा दुराग्रह करुन तिघांनी मंगेशला लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तर दि.११ जून रोजी मंगेश हा चोपड्याला जात असतांना संशयित महेंद्र पाटील याने मंगेशला धमकी देत त्याच्या अंगावर मोटार सायकल घेवून गेला होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर मंगेश पाटील या मुलाने रविवारी सकाळच्या सुमारास घरातील छत्ताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
वारंवार होणा-या त्रासाला कंटाळून एकुलत्या मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास मंगेशवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे मंगेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेच्या तीन दिवस अगोदर दि. १३ जून रोजी मंगेशचे काका वसंत पाटील यांनी मंगेशला वारंवार मिळणाऱ्या धमकी विषयी व त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतली नाही. त्यांनी दखल घेतली असती तर मंगेशचा जीव वाचला असता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईट नोट
आत्महत्या करण्यापुर्वी मंगेशने इंग्रजीमध्ये सुसाईट नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने, पप्पा आजपर्यंत मी जितक्या पण चुका केल्या असतील त्याच्यासाठी माफी मागतो. त्याचबरोबर सर्वांची हात जोडून माफी मागतो. मी हा निर्णय घ्यायला नको होता. पण मला आता रहायच नाही. माझ्याने आता सहन होत नाही. त्याने मला मारण्याची धमकी दिली आहे. मी फाशी लावून जीव देतो पण मला त्याच्या हातून मरायच नाही. त्यांना सोडू नका, त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे लिहून ठेवले आहे. पोलिसांनी ही सुसाईट नोट जप्त केली आहे.