आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्न फळाला, आरटीओने मिळविले १६ कोटींचे उत्पन्न
चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयला आज दि.७ मार्च रोजी १ वर्ष पूर्ण होत आहे. मिल्कसिटी, गणित नगरी अशी ओळख मिरविणाऱ्या चाळीसगावच्या मुकुटात एम एच ५२ अशी नवी “बावन्न”कशी ओळख निर्माण झाली आहे. आ. मंगेश चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने चाळीसगाव येथे स्थापन झालेल्या या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत ५८८९ दुचाकी, ४६३ छोट्या चारचाकी, ५४८ शेती ट्रक्टर, १२० मोठी मालवाहतूक वाहने आदी एकूण ७३४४ वाहनांची नोंदणी करण्यात आली. तसेच नवीन ३०४६ वाहन चालवण्याचे नवीन परवाने, १४७२ जुन्या परवान्यांचे नूतनीकरण देखील करण्यात आले. यातून वर्षभरात चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला १६ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
यासोबतच वाहनांच्या कामांसाठी जळगाव येथे १०० किमी अंतरावर वाहन धारकांची होणारी फिरफिर आता टळली असून चाळीसगाव येथेच सर्व काम होत असल्याने वाहनधारकांचा वेळ, श्रम, पैसा वाचत आहे. आ. मंगेश चव्हाण यांनी अवघ्या ३ महिन्यात चाळीसगाव येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी मंजूर करून आणला. एव्हड्यावरच ते थांबले नाहीत तर मंजुरीनंतर अवघ्या १५ दिवसात दि.७ मार्च २०२४ रोजी आपल्या एम एच ५२ या नव्या ओळखीसह कार्यालय कार्यान्वित करण्याची रेकॉर्ड कामगिरी देखील त्यांनी करून दाखवली.